As we go through the old stuff at my mother’s house, memories tumble down unexpectedely. As I decide to capture it all and not lose it again, I think of my mother who prefers to read in Marathi rather than English. So this one is for her. The one who gave us wings.
आईकडच्या जुन्या कागदपत्रांच्या निमित्ताने लहानपणीच्या आठवणींचा धागा उकलला आणि स्वेटर उसवावा तश्या आठवणीतुन आठवणी उलगडत चालल्या आहेत.
लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो. त्याआधी अगदी लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत, कारण तेंव्हा आई बाबांनाही सुट्टी असायची. आई बाबांबरोबर म्हणजे ट्रेन. मिरजेला बदलावी लागायची पहाटे पहाटे 5 ला. त्यावेळची सर्वात ठळक आठवण म्हणजे प्लॅटफॉर्म वर खाल्लेलं डबल ऑम्लेट आणि बाबांनी सांगितलेल्या त्यांच्या वालचंद कॉलेजच्या आठवणी. नंतर कितीही वेळा डबल आम्लेट घरी केलं तरी गुलाबी थंडीत अर्धवट झोपेत पण charged with excitement, पुढच्या गाडीत बसण्या आधी प्लॅटफॉर्म वर खाल्लेलं आम्लेट खाण्याची ती मज्जा येणे नाही.
नंतर खानापूरवरून जाणारी कारवार बस सुरु झाली. बदला बदलीची गरज उरली नाही. एका वर्षी हृदयावर दगड ठेऊन आईनी आम्हा तिघींना बस मध्ये बसवून दिलं. उतरवायला आजोबा येणार होते. नाश्ता, जेवण, खाऊ असं बरंच बांधून दिलं होतं. त्यातलं सर्वात लक्षात राहिलं ते आम्रखंड. विकतच, कोयरीच्या आकारातल्या डब्यात पॅक केलेलं. जायची टूम निघाल्यावर आम्ही खाऊ जमा करायला लागलो होतोच. कुणी गोळ्या बिस्किटं दिली की ती खाऊच्या पिशवीत जमा होत. सकाळी 5 ला निघून 3 ला दुपारी पोचायचं त्यामुळे बस मध्ये खायला असा सर्व जामानिमा होता. आईनी बसमध्ये कोणीतरी ओळखीचे शोधले होते, आमच्यावर लक्ष ठेवायला. ते प्रत्येक थांब्यावर विचारत पेरू हवा का, दाणे हवे का, काकडी हवी का. आम्हाला हे माहीत नसल्यामुळे आम्ही चांगल्याच घाबरलो. पळवून नेल्यास काय काय करता येईल ह्याच्या क्लुप्त्या तयार झाल्या. Overactive imagination gone wild. भरपूर खाऊ खिडकीवर विकायला येत होता. पण आम्ही शहाण्या मुलींसारखं सगळ्याला नको म्हटलं. पहिल्या वहिल्या एकल्या प्रवासात न चाखलेल्या या एसटी स्टॅन्ड मेव्याची कसर आता कितीही पेरू, बोरं, काकड्या, दाणे खाल्ले तरी भरून निघत नाही.
खानापूरला पोचेपर्यंत बस चांगलीच भरली होती. अगदी पुढे बसलेल्या आम्हाला मागच्या दारापर्यंत येऊन उतरायला बराच वेळ लागला. तोपर्यंत आजोबांनी आम्हाला शोधण्यासाठी बसला चारपाच प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्यांचं panic आजही मला तसंच्या तसं डोळ्यासमोर दिसतं. आम्ही आरामात महिनाभर आजोळी राहिलो, नदीवर हुंदडलो. भरपूर दंगा केला. परत येताना मात्र मामा सोडायला आला. तो असल्यानी कोणतीही चिंता नसल्यामुळे पूर्णवेळ उलट्या सीटवर गुढघे रोवून बसून, वेगाने पळत जाणारी गुलमोहोराची बघितलेली झाडं आजही लक्षात आहेत. नंतर प्रत्येक सुट्टीत आम्ही दोघी बहिणी कारवार गाडीनी खानापूरला जात राहिलो. लहानपणी असलेल्या गाई म्हशींपासून ते मामानी नंतर आणलेल्या कोंबड्यांपर्यंत, जिन्याखालच्या भाताच्या ढिगापासून ते पोह्याच्या गिरणीपर्यंत, शहरात न मिळणारे सर्व अनुभव या सुट्टीतल्या शाळेनी आम्हाला दिले. आजोबा त्यांच्या स्वछ पांढऱ्या धोतर, शर्ट आणि काळ्या कोटात बाहेर निघाले की आम्हीही बरोबर निघायचो. दोन दिवस मागच्या खोलीत भिजत घातलेलं भात उपसून तयार असे. ते आजोबा पोहे काढण्यासाठी घेऊन जात. त्यांच्या मोटठ्या काळ्या छत्रीखाली गिरणीतून परत येताना, पिशवीत हात घालून, चालता चालता खाल्लेल्या, जिभेवर विरघळणाऱ्या ताज्या गरम पोह्यांची चव अजूनही लक्षात आहे.
दुसरा उद्योग म्हणजे बाबुकाकांच्या गिरणीत तासनतास बसून येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची विविध दळणे बघत बसणे – धान्य, तेलबिया, मिरची, आणि काहीबाही शेतमाल. The way things spiralled down the spout and transformed into something completely different in color, feel, and smell was memsmerizing. आम्हाला हे सगळं इतकं नवीन होतं की आम्ही प्रत्येक गोष्टीला हात लावून आणि चव घेऊन बघत असू. तेल काढून उरलेल्या दाण्याची पेंड खाऊन बघण्यापर्यंत काहीही. बाबुकाकाही आमचे हे पराक्रम चालवून घेत असत. अगदी मिरची दळायला आल्यावर त्याचा खाट येईपर्यंत आम्ही गिरणीत ठाण मांडून बसत असू. बाबुकाका गिरणीत दहाबारा फूट उंचावर असलेल्या त्यांच्या खुर्चीत बसत असत. लहानपणी सिंहासना सारखी वाटणारी ती खुर्ची आणि उंच शिडशिडीत बाबुकाका म्हणजे काहीतरी वेगळच प्रकरण वाटायचं. बाबुकाका सुद्धा वल्ली माणूस. “हल्याळ यष्टी गॉन तुझ्या नाकावरून गॉन” असं म्हणत माझ्या नकट्या नाकाची चेष्टा करणारा त्यांचा खणखणीत आवाज, गिरणी इतकाच अजूनही कानात भरून राहिला आहे.
As I think back I realize, aai, ajoba-ajji, mama-mami and many more had to endure anxiety, agitation, lack of quiet and much more to give us a chance at becoming the independent, inquisitive, brave women we have grown up to be.