Social Media, Technology & Education

Peers and Play: खेळातून अभ्यास आणि सवंगड्यां बरोबर अभ्यास

Excerpt from आनंदशाळा: neighbourhood schools

खेळ आणि मित्र मैत्रिणीं बरोबर शिकायचं म्हणजे नक्की काय याचं एक छान उदाहरण सेवालाल नगरच्या आनंदशाळेत गेलेले असताना दिसलं. एका तासाला विकासदादानी सर्व मुलांना दोन गटात विभागलं. एका गटानी गणित घालायच आणि ते दुसऱ्या गटानी वहीत न लिहिता मनात सोडवून उत्तर द्यायचं. पहिल्या गटानी उत्तर बरोबर आहे का हे सांगायचं असे खेळाचे नियम ठरले. जोरदार स्पर्धा सुरू झाली. वेगानी आकडे येऊ लागले. काही मुलांना विचार करायला वेळच मिळेना मग विकासदादा मध्ये  पडले आणि उत्तर न देणाऱ्या मुलांना वेळ आणि संधि मिळेल असं पाहू लागले.

एका मुलीनी मग उत्साहानी गणित घातलं. दादानी मागे बसलेल्या एका मुलाला उत्तर सांगायला सांगितलं. उत्तर बरोबर आहे का हे मुलीला सांगता येईना. गणित घालायच्या उत्साहात ती ते सोडवायचं विसरली होती. इतर मुली तिच्या मदतीला आल्या आणि उत्तर बरोबर आहे असं सांगितलं. आणखीन एका राऊंड मध्ये पहिल्या गटातल्या एका मुलानी सांगितलेलं उत्तर दूसऱ्या गटानी चूक आहे म्हटलं. मुलानी पुनः सोडवून पाहिल आणि तेच उत्तर दिलं. पुन्हा गट अडून बसला उत्तर चुकलं म्हणून. दादा शांतपणे उत्तर न सांगता, मुलं काय करतात ते पहात होते. शेवटी वहीत करून पहा अस दुसऱ्या गटानी सुचवलं. वहीत मांडल्यावर त्याला त्याची चूक लक्षात आली. खेळ पुढे सरकला.

खेळा मुळे संचारलेल्या उत्साहामुळे मागे बसणारी आणि मागे राहणारी मुले सुद्धा हिरीरीने भाग घेऊ लागली. गणित आपणही घालू शकतो, चूक-बरोबर आपणही ठरवू शकतो ह्या नव्या अनुभवामुळे सर्वच मुलांचा आनंद, उत्साह, आणि प्रामुख्याने आत्मविश्वास झपाट्याने वाढला.

बाहेरच्या एखाद्याला हा गोंधळ, गडबड, आणि मुलांचा आवाज ऐकून, मुलांवर शिक्षकांचं नियंत्रण नाही अस वाटणं  साहजिकच आहे. पण ह्या खेळाचं एक विशिष्ट उद्दिष्ट आहे – सराव आणि प्रवाहीपणा (fluency) – जेणेकरून पुढची गणिती प्रक्रिया शिकण्यासाठी पाया पक्का व्हावा. इतरांना गोंधळ वाटला तरीही दादांचं मुलांवर बारीक लक्ष होतं. गरज लागेल तेंव्हा मध्ये पडून आणि इतर वेळी मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देत ते त्यांनी साध्य केलं. अशा खेळातून शिकण्यातून केवळ विषयाचं प्रभूत्वच नाही तर इतर अध्ययन कौशल्यही मुलांपर्यंत पोहचवता येतात. स्वतःच्या कामाचा विचार करणे, चिंतन (reflection), आपली एखादी गोष्ट चुकली हे समजणे, ते मान्य करणे; आपल्याला एखादी गोष्ट येत नाही हे समजणे आणि ती शिकण्याची इच्छा असणे ही metacognitive skills तयार होण्याची महत्वाची पायरी आहे.

आपल्या पारंपारिक/पठडीबाज शाळांमध्ये शिक्षक ज्ञानाचे खजिनदार असतात. चूक का बरोबर हे ठरवण्याचा अधिकार ही त्यांच्याकडेच असतो. अशा परिस्थितीत मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि स्वअभ्यासाची कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच मिळत नाही. शिकायला आनंद वाटेल अशी पद्धत आणि facilitator असलेले ताई/दादा यामुळे शिक्षणाची जबाबदारी मुलांना पुन्हा आपल्या हातात घेणं शक्य झालं.

करोना काळात शाळा बंद होत्या तेंव्हा, शिकवण्याच्या विविध पद्धती, असलेल्या परिस्थितीतून शिक्षकांनी काढलेले मार्ग याचा बराच ऊहापोह झाला परंतु तो ऑनलाइन शिक्षणापुरता मर्यादित होता. ऑनलाइन शिवाय इतर पद्धतीं मध्ये अशा छोट्या छोट्या neighbourhood schools चा विचारही करायला हरकत नाही. त्या यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल याचं हे एक उदाहरण.