Musings

निसर्गातली लगबग

रोज आंघोळ करताना खिडकीतून एक सुगरणीचं जोडपं घरटं करताना दिसतं. सुरवातीला नुसतं फांदीला लटकलेला अर्धगोल होता आता पूर्ण गोळा तयार झालाय. त्याला आत जायला जागा आणि त्याला वरून आवरण आहे. काडी काडी आणून, रोज थोड थोड करून अगदी सुबक बांधकाम झालंय.
जागोजागी शिंपी सुद्धा गवताची पाती आणून खोपच्यामध्ये घरटी बनवताहेत. एक खिडकी आणि जाळीच्या मध्ये, एक गुलाबाच्या वेलीच्या गचपणात अस जोरदार काम चालू आहे. लांब लचक गवताची पाती घेऊन उडताना हे पक्षी फारच मजेशीर वाटतात. पलिकडे शेतात लावलेली सोयाबीन आणि इतर पिकं जेमतेम दिसत होती, ती आता वाढून शेत गच्च भरल आहे.

हराळीला आलं की अशी निसर्गात चाललेली अॅक्शन बघता बघता आपोआप मन स्थिरावतं.

आज नाश्ता करायला जाताना मुंग्यांची रांग दिसली पण काहीतरी वेगळ वाटल म्हणून थांबले तर मुंग्या नाही तर termite ची लगबग चाललेली दिसली. एका बिळातून दुसऱ्या बिळात ओळीनी सर्व चालले होते. मध्येच एक काळा मोठा मुंगळा आला आणि त्यांच्यात घुसला. भोजनगृहाबाहेर मुंगळ्यांची रांग गेले 4-5 दिवस आहे. पण हा पठ्ठ्या वाट चुकून इथे अलीकडेच कुठे असा विचार करत होते तोपर्यंत तो termite च्या लायनीत घुसला आणि त्यांना खायला लागला. गौरी आणि मी आश्चर्यानी बघायला लागलो आणि तो खरतर termite सोडतोय आणि त्यांच्या पकडीत असेलेल पांढरं काहीतरी खतोय अस लक्षात आल. म्हणजे ही सगळी मंडळी बहुतेक अंडी हलवत होती असं दिसतय. मुंग्यांना अंडी हलवताना पाहिल होतं पण termite ना कधी पाहिलं नव्हत.

मुंगळ्याचा असा डल्ला मारणं सुरू होतं तोपर्यन्त termite च्या रांगेत अचानक उलट्या दिशेनी येणारे मोठया लाल डोक्याचे प्रकार दिसू लागले. त्यांच्या कडे बघत होतो तोपर्यन्त त्यांच्या फौजेपैकी काहीनी मुंगळ्याला घेरल आणि बहुतेक चावायला सुरवात केली. मुंगळ्यानी self-defence साठी स्वतःचं मुटकुळ करून घेतल. पण मुंगळा जोपर्यन्त रांगे पासून दूर जात नाही तोपर्यंत ह्या पठयानी त्याला सोडल नाही. हे विशेष फौजेतले termite चे प्रकारही मी पहिल्यांदाच पाहिले.

एक महिनाभरामध्ये जसं हळूहळू पुढे जाणारं काम, बदलत जाणारा निसर्ग पाहायला मिळतो तसं अचानक थरार नाट्य सुद्धा पाहायला मिळतं.

Leave a comment